“ज्या शाळेत घडलो, वाढलो त्या शाळेसाठी खासदार निधी उपलब्ध करून देणे हे मी माझे कर्तव्य समजतो” अशा शब्दात शाळेचे माजी विद्यार्थी आणि राज्यसभेतील खासदार अमरजी साबळे यांनी शाळेबद्दलची कृतजता व्यक्त केली. महाराष्ट् एज्युकेशन सोसायटीच्या कै. गजाननराव भिवराव देशपांडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील अद्ययावत संगणक प्रयोगशाळा व डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन राज्यसभेतील खासदार मा. श्री. अमर साबळे यांच्या हस्ते सोमवार, दि. ३ डिसेंबर २०१८ रोजी करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. खासदार स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत खा. साबळे यांनी दिलेल्या निधीतून शाळेमध्ये ६० संगणक व ७ प्रोजेक्टर बसविण्यात आले आहेत. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष मा. प्रदीपजी नाईक या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. राजीव सहस्रबुद्धे, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, साहाय्यक सचिव प्रा. सुधीर गाडे, शाला समितीचे अध्यक्ष व संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य अॅड. धनंजय खुर्जेकर, शाळेचे महामात्र प्रा. गोविंद कुलकर्णी, स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य डॉ. राजकुमार छाजेड, राजीवजी देशपांडे, समितीचे समन्वयक पी.बी. कुलकर्णी, मुख्याध्यापक विजय सोनवणे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. “मानवी जीवन अधिक सुखी व समृद्ध करण्यासाठी संगणकाचा उपयोग करता येऊ शकतो. देशातील खेडी स्वयंपूर्ण व्हावीत असे म्हटले जाते. त्यामुऴे, तिथे प्राथमिक व मूलभूत गरजा उपलब्ध व्हाव्यात यासाठी एक उपक्रम आपण हाती घेतला आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या नागरिकांना परवडणाऱ्या दरात आरोग्यसल्ला आणि सुविधा त्यांच्या गावांत मिळाव्यात यासाठी इंटरनेटच्या माध्यमातून व्यवस्था निर्माण करण्याचा आपला प्रयत्न आहे. ही व्यवस्था उभी राहिली तर ती एक क्रांती घडेल. सामाजिक जाणीवेचा हा संस्कार मला महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत मिळाला. पारंपारिक शिक्षण पद्धती आणि जगातील उत्तमोत्तम शिक्षण पद्धतीचा मेळ घालून संगणकाच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना कालानुरूप शिक्षण देण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. समाजातील विविध समस्या, विसंवाद, ताणतणाव दूर करण्यासाठी शिक्षण संस्थांनी पुढे येणे गरजेचे आहे,” अशी अपेक्षा खा. साबळे यांनी या प्रसंगी व्यक्त केली. खा. साबळे १९७८ च्या बॅचचे माजी विद्यार्थी असून त्यांचे सहाध्यायी तसेच त्यांचे शिक्षक एम.डब्ल्यू. जोशी सर, चावरे सर व झाडबुके सर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. धनंजय खुर्जेकर यांनी केले. ते म्हणाले, “ दृकश्राव्य माध्यमामुळे शिक्षण मनावर ठसते, शिकवण्यासाठी वेगळे कष्ट घ्यावे लागत नाहीत. त्यामुळे त्याचे महत्त्व आहे. खा. साबळे यांनी दिलेल्या निधीमुळे शाळेत संगणक प्रयोगशाळा व डिजिटल क्लासरूमची निर्मिती शक्य झाली आहे. मात्र शाळेतील १९७८ सालच्या बॅचनी दिलेली ही देणगी आहे अशीच खा. साबळे यांची भावना आहे, ही विशेष बाब आहे. संस्थेच्या शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्षात ते संस्थेसाठी अधिक योगदान देतील अशी आपण आशा करूया.” आपल्या भाषणात संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. राजीव सहस्रबुद्धे म्हणाले की खा. साबळे यांनी स्वखुशीने दिलेल्या निधीतून शाळेत संगणक प्रयोगशाळा व डिजिटल क्लासरूम उभी राहिली आहे. त्यांच्या निर्मितीसाठी ते केवळ निधी न देता अतिशय आत्मीयतेने त्यासंबंधात सातत्याने पाठपुरावा करत होते. ‘मएसो’च्या शाळेत होणाऱ्या संस्कारांमुळे घडणाऱ्या व्यक्तिमत्वाचे उदाहरण म्हणजे मा. अमर साबळे हे आहेत. संस्थेच्या शतकोत्तर हीरक महोत्सवात ते आजपेक्षा अधिक मोठ्या पदावरून सहभागी होतील अशी आशा आपण करूयात. संस्थेचे उपाध्यक्ष मा. प्रदीपजी नाईक आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, “सामाजिक जाणीव असलेला नेता कशा पद्धतीने विचार करतो हे खा. साबळे यांच्या भाषणातून दिसून आले. शिक्षणाच्या क्षेत्रात आज सर्व जागतिक दर्जाच्या आणि आधुनिक सुविधा असल्या पाहिजेत. खा. साबळे यांनी आपल्या शाळेसाठी त्या उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन!” १९७८ च्या बॅचचे माजी विद्यार्थ्यांच्या वतीने सौ. माधवी लिमये (शाळेतील श्री. पावसकर सरांची कन्या) यांनी भावना व्यक्त केल्या. धनंजय मेळकुंदे यांनी सूत्रसंचालन तर मुख्याध्यापक विजय सोनवणे यांनी आभार प्रदर्शन केले. संपूर्ण वंदे मातरम् गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.