मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनीची साहित्यक्षेत्रात उत्तुंग भरारी

यवतमाळ येथे होणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवयित्री, समीक्षक डॉ. अरुणा ढेरे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी आहेत. याचा संस्थेला सार्थ अभिमान असून संस्थेच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन!

डॉ. ढेरे यांच्या रूपाने संमेलनाध्यक्षपदी पाचव्यांदा महिला विराजमान होत आहे. १९६१ साली ग्वाल्हेर येथील संमेलनाचे अध्यक्षपद कुसुमावती देशपांडे, १९७५ साली कराड येथे झालेल्या संमेलनाचे अध्यक्षपद दुर्गा भागवत, १९९६ साली आळंदी येथील संमेलनाचे अध्यक्षपद शांता शेळके आणि २००१ साली इंदूर येथे झालेल्या संमेलनाचे अध्यक्षपद विजया राजाध्यक्ष यांनी भुषवले होते. त्यानंतर तब्बल १७ वर्षांनी यवतमाळ येथे होणाऱ्या संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यिकेची निवड झाली आहे.

हे संमेलन दि. ११ ते १३ जानेवारी २०१९ या कालावधीत होणार आहे. 

अरुणा ढेरे यांचा जन्म दि. २ फेब्रुवारी १९५७ साली पुणे येथे झाला. तेथेच त्यांचे एम.ए.तसेच पीएच.डी. पर्यंतचे सर्व शिक्षण झाले. त्या पुणे विद्यापीठाच्या मराठी साहित्यातील विद्यावाचस्पती म्हणजेच डॉक्टरेट आहेत. इ.स.१९८३ ते ८८ या काळात त्यांनी प्राध्यापिका म्हणून पुणे विद्यापीठात काम केलेले आहे. 

प्राचीन वाङ्मय, लोकसाहित्य तसेच संतसाहित्याचे अभ्यासक आणि ज्येष्ठ संशोधक कै. डॉ. रा.चिं. ढेरे यांच्या अरुणा ढेरे ह्या कन्या होत.