पुणे – ‘शौर्य’ शिबिरामुळे आत्मविश्वास वाढला आणि साहसी वृत्तीला प्रोत्साहन मिळाल्याचे मनोगत ‘शौर्य’ शिबिराच्या समारोपप्रसंगी शिबिरात सहभागी झालेली मुले-मुली व त्यांच्या पालकांनी व्यक्त केले. 

म.ए.सो.राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेत शनिवार, दि. ५ मे २०१८ ते शनिवार, दि.१२ मे २०१८ या कालावधीत ‘शौर्य’ साहसी क्रीडा प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा समारोप शनिवार, दि.१२ मे २०१८ रोजी उत्साहात पार पडला. मएसो गरवारे वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आनंद लेले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. शाला समितीच्या अध्यक्षा डॉ. माधवी मेहेंदळे, मएसो क्रीडावर्धिनीचे समन्वयक शैलेश आपटे, शाळेच्या माजी विद्यार्थिनी मेजर अर्चिस सबनीस व स्क्वॉड्रन लीडर वैष्णवी टोकेकर यावेळी उपस्थित होते. 

‘शौर्य’ शिबिरातून फक्त साहसी वृत्ती वाढीस न लागता संस्काराची जोपासना केली जाते असे प्रमुख पाहुणे डॉ. आनंद लेले यांनी आपल्या भाषणात सांगितले. तर या शिबिरातून विविध प्रकारच्या साहसाबरोबर कलांची तोंडओळख करून दिली, असे डॉ.माधवी मेहेंदळे यांनी सांगितले. 

शिबिरप्रमुख प्रशांत जोशी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. शाळेचे कमांडंट कर्नल सारंग काशीकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. शाळेच्या मुख्याध्यापिका पूजा जोग यांनी आभार मानले. उपमुख्याध्यापक अनंत कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.