जिद्द आणि उच्च ध्येय हाच यशाचा मार्ग - मेजर जनरल शिशिर महाजन (निवृत्त)

पुणे, दि. ५ - “जीवनात यशस्वी होण्यासाठी लहानपणापासूनच परिश्रम, जिद्द, चिकाटी, स्वावलंबन या गुणांचा अबलंब करून उच्च ध्येय ठेवावे” असा सल्ला मेजर जनरल शिशिर महाजन (निवृत्त) यांनी आज येथे दिला. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेत आयोजित करण्यात आलेल्या ‘शौर्य’ या साहसी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन मेजर जनरल महाजन (निवृत्त) यांच्या हस्ते झाले, त्यावेळी महाजन बोलत होते. 

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे, संस्थेचे सचिव डॉ. संतोष देशपांडे, संस्थेच्या आजीव सदस्य मंडळाचे सदस्य प्रा. सुधीर भोसले, डॉ. अतुल कुलकर्णी, शाळेच्या महामात्रा डॉ. मानसी भाटे, शाळेच्या प्राचार्या सौ. पूजा जोग, कमांडट कर्नल सारंग काशीकर (निवृत्त) या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते. 

आपल्या अध्यक्षीय भाषणात राजीव सहस्रबुद्धे यांनी, शिबिरार्थींनी या शिबिरातून उत्तम संस्कार, उत्तम सैनिकी गुण प्राप्त करावेत आणि शारीरिक तसेच मानसिक क्षमता विकसित करावी असे सांगितले.

म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेने सुट्टीच्या या काळात मुलांना केवळ गुंतवून न ठेवता त्यांच्या विकासासाठी खऱ्या अर्थाने उपयोगी ठरेल असे क्रीडा प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे. त्यामध्ये राज्यभरातून प्रशिक्षणार्थी सहभागी झाले आहेत. मानसिक पातळीवर सकारात्मक परिणाम घडवणाऱ्या योग, सूर्यनमस्कार, रोप मल्लखांब यासारख्या क्रीडाप्रकारांबरोबरच अश्वारोहण, रिव्हर क्रॉसिंग यासारख्या साहसी प्रकारांचीही योजना या शिबिरात करण्यात आली आहे. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत जोशी यांनी केले. कर्नल सारंग काशीकर (निवृत्त) यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. शाळेच्या प्राचार्या सौ. पूजा जोग यांनी आभार मानले. 

शाळेचे उपमुख्याध्यापक अनंत कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.