राज्याचे शिक्षण आयुक्त म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल मा. विशाल सोलंकी यांचे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. राजीवजी सहस्रबुद्धे यांनी आज मा. सोलंकी यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मा. सोलंकी हे भारतीय प्रशासकीय सेवेतील आसाम केडरचे अधिकारी असून गेली १४ वर्षे ते आसाममध्ये कार्यरत होते. आसाममधील दोन जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिल्यानंतर आसाम सरकारच्या अर्थखात्यात आणि त्यानंतर आसामच्या मुख्य सचिवांच्या कार्यालयात ते कार्यरत होते. आसामच्या मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. 

सोलंकी यांची नुकतीच महाराष्ट्राचे शिक्षण आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली असून शिक्षण विभागातील ८ संचलनालयांमध्ये समन्वय साधण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. 

मा. विशाल सोलंकी हे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सासवड येथील वाघीरे विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. त्यामुळे संस्थेतर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव डॉ. संतोष देशपांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सचिन आंबर्डेकर, प्रबंधक श्री. नीलकंठ मांडके, शैक्षणिक विकास अधिकारी श्री. अजित बागाईतकर उपस्थित होते.