विद्यार्थ्यांमध्ये ‘दातृत्व’ या गुणाची जोपासना व्हावी या हेतूने आपल्या विद्यालयात एकमुष्टी धान्य योजना राबविण्यात येते. या योजनेत जमा झालेले धान्य तोरणा राजगड परिसर समाजोन्नती न्यास या संस्थेस प्रदान करण्याचा कार्यक्रम शनिवार, दि. १० मार्च २०१८ रोजी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुण्यातील स्वरुपवर्धिनी या संस्थेचे कार्याध्यक्ष मा. रामभाऊ डिंबळे होते. तोरणा राजगड परिसर समाजोन्नती न्यासाचे सचिव मा. मंदार अत्रे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. सचिन आंबर्डेकर तसेच तोरणा राजगड परिसर समाजोन्नती न्यासातर्फे चालविण्यात येणाऱ्या वसतिगृहाचे व्यवस्थापक मा. रमेश आंबेकर हेदेखील या वेळी उपस्थित होते. 

मा. डिंबळे यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळे यांचा इतिहास विद्यार्थ्यांसमोर मांडत तसेच आपल्या दैनंदिन जीवनातील काही उदाहरणे व अनुभव सांगत दातृत्व गुणाचे महत्व स्पष्ट केले. मा. अत्रे यांनी तोरणा राजगड परिसर समाजोन्नती न्यासाचे विविध उपक्रम आणि योजना यांची माहिती दिली. मा. आंबर्डेकर यांनी एकमुष्टी धान्य गोळा केल्याबद्दल विद्यालयातील विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मा. मुख्याध्यापक एस.बी. कुलकर्णी यांनी तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय ज्येष्ठ शिक्षक रामदासी यांनी करून दिला. विद्यालयातील शिक्षक विनोद पारे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. श्री. जगताप सरांनी आभार प्रदर्शन केले. 

आपल्या विद्यालयातील प्रत्येक विद्यार्थी तसेच पदाधिकारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी एकमुष्टी धान्य योजनेअंतर्गत धान्य गोळा केले. संकलित केलेले हे धान्य तोरणा राजगड परिसर समाजोन्नती न्यासातर्फे वेल्हा येथे चालविण्यात येणाऱ्या वसतिगृहाला देण्यात आले.