म.ए.सो. बालशिक्षण मंदिर इंग्लिश मिडीयम शाळेत नेहमीच अभिनव उपक्रम केले जातात. शिवजयंतीचे औचित्य साधून गेली ३ वर्षे शाळेत ‘स्पोर्ट्स एथलेटिक्स मीट’ आयोजित केली जाते. यावर्षी या स्पर्धेत पुणे शहरातील २३ नामवंत शाळा आणि विविध स्पोर्ट्स क्लबचे २८० स्पर्धक सहभागी झाले होते. उद्घाटन सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून एथलेटिक्स तज्ञ हर्षल निकम, ‘मएसो’चे सहसचिव व शाळेचे महामात्र डॉ. भरत व्हनकटे, क्रीडावर्धिनीचे महामात्र प्रा. सुधीर भोसले, क्रीडावर्धिनीचे समन्वयक प्रा. शैलेश आपटे, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. गीतांजली बोधनकर उपस्थित होते. स्पर्धेच्या बक्षीस समारंभास सुनील शिवले प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. त्यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी महाराष्ट्रातील लोककलांच्या माध्यमातून साहसी खेळ सादर करण्यात आले. १०,१२,१४ वर्षाखालील खेळाडूंच्या सांघिक, वैयक्तिक स्पर्धा झाल्या. गोळाफेक, लांब उडी, धावणे इ. स्पर्धा झाल्या. विद्यार्थ्यांचा उत्साह,चुरस पहाण्यासारखी होती. आनंद णि उत्साहाच्या वातावरणात या स्पर्धा पार पडल्या. सर्वसाधारण गटात मुले विभागाचे विजेतेपद डॉ. कलमाडी शामराव विद्यालयाला तर मुलींच्या विभागाचे विजेतेपद म.ए.सो.बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मिडियम शाळेला मिळाले. सर्वोत्तम विजेतेपददेखील म.ए.सो.बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मीडियम शाळेला मिळाले. साहसी खेळ व व्यायाम हे शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेचा अविभाज्य भाग आहे. आजच्या ‘व्हर्चुअल गेम’च्या जमान्यात मुले मैदानी खेळ खेळत नाहीत ही ज्वलंत समस्या आहे. त्यावर ‘स्पोर्ट्स एथलेटिक मीट’ हा एक खूप प्रभावी उपाय असून तो उपयुक्त आणि प्रोत्साहन देणारा ठरत आहे, असे इतर शाळांच्या क्रीडा शिक्षकांनी सांगितले.