महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवार, दि. १९ डिसेंबर २०१६ रोजी संध्याकाळी ७.०० वा. पुण्यात कर्वे रस्त्याच्या प्रारंभी असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात असलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळीस महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेच्या विद्यार्थिनींनी मा. मुख्यमंत्री फडणवीस यांना मानवंदना दिली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची 'जयोस्तुते श्रीमहन्मंगले! शिवास्पदे शुभदे...' ही रचना शाळेच्या घोष पथकाने सादर करून मुख्यमंत्र्याबरोबरच उपस्थितांची मने जिंकली. मानवंदना देताना जाणवणारा विद्यार्थिनींचा आत्मविश्वास आणि शिस्त पाहून मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले. या वेळी त्यांनी विद्यार्थिनींकडून महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि सैनिकी शाळेची माहिती घेतली आणि या कॅडेट्सबरोबर फोटोही काढला. देशातील पहिली मुलींची सैनिकी शाळा पुण्याजवळ मुळशी तालुक्यात असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. विद्यार्थिनी आणि शिक्षकांबरोबर झालेल्या संवादात मुख्यमंत्र्यांनी "सैनिकी शाळेत नक्की येऊ!" असे आश्वासन दिले. शाळेच्या विद्यार्थिनींसाठी एकूणच हा अनुभव अत्यंत प्रेरणादायी व रोमांचकारी ठरला. या वेळी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे अन्नपुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री मा. गिरीश बापट, सामाजिक न्याय मंत्री मा. दिलीप कांबळे, पुण्याचे मा. महापौर प्रशांत जगताप, पुण्याचे खासदार अनिल शिरोळे, आमदार सौ. मेधा कुलकर्णी, आमदार विजय काळे, आमदार भीमराव तापकीर, नगरसेवक गणेश बिडकर, नगरसेविका सौ. माधुरी सहस्रबुद्धे व इतर मान्यवर उपस्थित होते. मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलेल्या मानवंदनेचे नियोजन म.ए.सो.च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा.राजीव सहस्रबुद्धे, शाला समिती अध्यक्षा डॉ. माधवीताई मेहेंदळे यांनी केले. या कार्यक्रमासाठी शाळेच्या प्राचार्या पूजा जोग, उप-प्राचार्य श्री. अनंत कुलकर्णी, कॅप्टन बनसोडे, श्री. गुंड व श्री. जगधने सर यांनी विशेष प्रयत्न केले.