युवा चेतना दिनाची दै. लोकमतमधील बातमी

 

युवा चेतना दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलताना विवेकानंद केंद्राचे विश्वासराव लपालकर होते. या वेळी व्यासपीठावर (डावीकडून) मएसोचे सहाय्यक सचिव डॉ. भरत व्हनकटे, मएसोच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे, आंतरराष्ट्रीय नेमबाज तेजस्विनी सावंत-दरेकर, मएसोचे उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे, मएसोच्या नियामक मंडळाचे सदस्य जयंत म्हाळगी, मएसोचे सचिव डॉ. संतोष देशपांडे, नियामक मंडळाचे सदस्य भालचंद्र पुरंदरे आणि संस्थेचे आजीव सदस्य प्रा. सुधीर भोसले.

 

मएसोच्या राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेच्या ‘निर्भय भारत’ मोहिमेत सहभागी झालेल्या १५ विद्यार्थिनींचा सत्कार करताना विवेकानंद केंद्राचे विश्वासराव लपालकर आणि तेजस्विनी सावंत-दरेकर.

“स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या दिवशी भारताला विश्वगुरू बनवायचा संकल्प करायला पाहिजे. भीष्मांसारखी दृढ प्रतिज्ञा करा, भगीरथासारखे अथक प्रयत्न करा आणि भीमासारखा अतुलनीय पराक्रम गाजवा. आपण देवाला नेहमीच संपूर्ण फुललेले फुल अर्पण करतो, कळी किंवा अर्धवट फुललेले फुल कधीच वाहात नाही. तारुण्यदेखील असेच असते. आपले भविष्य ठरविण्याची हीच खरी वेळ असते. त्यामुळे ध्येय ठरवताना आपले जीवन भारतमातेला अर्पण करायचे आहे हे निश्चित ठरवा. आपल्या डोळ्यासमोर केवळ आपला भारत देशच असला पाहिजे,” असे प्रतिपादन विवेकानंद केंद्राचे ज्येष्ठ कार्यकर्ते विश्वासराव लपालकर यांनी येथे केले.

स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे गुरुवार, दि. १२ जानेवारी २०१७ रोजी गरवारे महाविद्यालयाच्या मौदानावर आयोजित करण्यात आलेल्या युवा चेतना दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. आंतरराष्ट्रीय नेमबाज सौ. तेजस्विनी सावंत-दरेकर या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. या वेळी व्यासपीठावर दरेकर, मएसोचे सहाय्यक सचिव डॉ. भरत व्हनकटे, मएसोच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे, मएसोचे उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे, मएसोच्या नियामक मंडळाचे सदस्य जयंत म्हाळगी, मएसोचे सचिव डॉ. संतोष देशपांडे, नियामक मंडळाचे सदस्य भालचंद्र पुरंदरे आणि संस्थेचे आजीव सदस्य प्रा. सुधीर भोसले उपस्थित होते.

“आपल्यात ईश्वराचा अंश आहे हा आत्मविश्वास बाळगा, ईच्छाशक्ती मजबूत ठेवा, नेहमीच सकारात्मक विचार करा, प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे हे ओळखून सतत क्रियाशील राहा आणि उच्च ध्येय प्राप्त करण्याची महत्वाकांक्षा बाळगा तरच तुमचे जीवन स्वामी विवेकानंदांसारखे होईल. ज्याप्रमाणे चुंबक लोखंडाला आकर्षित करते आणि नंतर लोखंडच चुंबक बनून जाते तसेच स्वामीजींच्या विचारांमुळे घडून येते. त्यांच्या विचारांमुळे तुम्हीदेखील स्वामीजींचे लघुरूप बनू शकता. स्वामीजींच्या जीवनाचा अभ्यास करून त्यातून योग्य ती शिकवण घेऊन आपल्या देशासाठी योगदान द्या. तरूण पिढीवर माझा विश्वास आहे आणि जग घडवण्याची ताकद तरूण पिढीत आहे असे स्वामी विवेकानंद नेहमी म्हणायचे. तुमच्यात सर्व क्षमता विद्यमान आहेत, त्यामुळे तुमच्या कर्तृत्वाला मर्यादा नाहीत हा स्वामी विवेकानंद यांचा संदेश विशेषतः तरूणांनी लक्षात घेण्याची गरज आहे. स्वामीजींच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन आजपर्यंत अनेकांनी भव्य-दिव्य कार्य उभी केली आहेत. गरजवंताचे अश्रू पुसण्यासाठी, भुकेलेल्याला जेवू घालण्यासाठी जेव्हा आपले हात वापरले जातात तेव्हाच परमेश्वराने आपल्याला दिलेल्या हातांचे सार्थक होते. आपण जेव्हा इतरांसाठी जगायला शिकू तेव्हाच आपण जिवंत आहोत असे म्हणता येईल. आपल्याला मिळालेल्या सुंदर शरीराचा उपयोग कसा करायचा हे तरूण वयातच शिकवायला हवे,” असे लपालकर म्हणाले.

आंतरराष्ट्रीय नेमबाज तेजस्विनी सावंत-दरेकर कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून बोलताना म्हणाल्या, “जीवनात शिक्षणाचे महत्त्व तर आहेच पण खेळांचेदेखील महत्त्व आहे. क्रीडा प्रकारांमुळे व्यक्तीचा सर्वांगीण विकास होतो. अडचणींवर सहजपणे मात कशी करायची हे कळते. जीवनात वेळ ही खूप महत्त्वाची असते. आपले करियर आपणच निवडले पाहिजे आणि त्यात सर्वोच्च स्थानी पोहोचले पाहिजे. आई-वडील आणि गुरू यांच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवलात तर कल्पनेपेक्षा जास्त यश मिळते. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी क्रीडा क्षेत्राला जे महत्व देत आहे ते खूप महत्त्वाचे आहे, संस्थेचे प्रयत्न प्रामाणिक आहेत.”

मएसोच्या राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेच्या ‘निर्भय भारत’ मोहिमेची सांगता याच कार्यक्रमात झाली. कार्यक्रमाच्या प्रारंभी मोहिमेत सहभागी झालेल्या १५ विद्यार्थिनी, शिक्षक तसेच मोहिमेत विविध जबाबदाऱ्या पार पाडलेल्या व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या मोहिमेसाठी गेल्या ६ महिन्यांपासून १५०० जण कष्ट घेत होते. नियोजनपूर्वक या सर्वांनी केलेल्या सांघिक प्रयत्नांमुळेच ही मोहीम यशस्वी झाली. मोहिमेच्या ९ दिवसात सुमारे ३ लाख नागरिकांशी संपर्क करून निर्भय होण्याचा संदेश देण्यात आला. ही एक वैचारिक क्रांती आहे असे मोहिमेचे प्रमुख भालचंद्र पुरंदरे आपल्या भाषणात म्हणाले.

मएसोच्या ८ शाखांमधील सुमारे ३५० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी ध्वजपथक, मल्लखांब, योगासने, वेत्रचर्म, झुंबा डान्स, मर्दानी खेळ, ॲरोबिक्स, कराटे, जाळातील उड्या अशी विविध प्रात्यक्षिके या वेळी सादर केली.
मएसोच्या नियामक मंडळाचे सदस्य आणि युवा चेतना दिन कार्यक्रमाच्या संयोजन समितीचे अध्यक्ष जयंत म्हाळगी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. सुधीर भोसले यांनी करून दिला. प्रा. जयश्री पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.